top of page

मुलभूत  १६ गुण जे जीवन शिक्षणाकरिता महत्त्वाचे आहेत

कल्पकता / Imagination

माणसाच्या विकासाच्या प्रत्येक टप्प्याला कल्पकतेची जोड आहे. गगनचुंबी इमारती, चविष्ट पदार्थ, सॉफ्टवेअर प्रोग्राम, दुचाकी/चारचाकी गाड्या सगळ्यांची सुरुवात कुठल्या ना कुठल्या कल्पनेतूनच झाली आहे. जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाचा मेंदू म्हणजे कल्पकतेची सुपीक जमीन! त्याला खत-पाणी तेवढं लागणार! त्याऐवजी कारखान्यासारखे उत्पादन काढणाऱ्या शाळा मुलांच्या कल्पकतेलाच मारून टाकतात. अनबॉक्सकडे शास्त्रीय आणि अनुभवाच्या मुशीतून निघालेल्या अशा अनेक ॲक्टिव्हिटीज् आहेत ज्या मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देतात. मुलभूत सहजपणातून निघणाऱ्या कल्पना! सर्जनशीलतेला दैनंदिन जगण्याचा भाग बनवणाऱ्या कल्पना!

 

संवेदनांचा विकास / Sensorial Development

जटिल किंवा क्लिष्ट प्रश्न सोडवण्याच्या क्षमतेबरोबरच मुलामध्ये परस्परसंबंध जोडण्याची आणि टिकवण्याची क्षमता असावी असे प्रत्येक पालकाला वाटते. आपली पाच इंद्रिये संवेदनांशी थेट जोडलेली आहेत. मेंदूकडे आलेल्या माहितीचे संकलन करून तिला योग्य तो प्रतिसाद देण्यासाठी या ज्ञानेंद्रियांची संवेदनांशी सूक्ष्म जोडणी किंवा जुळवाजुळव करावी लागते. अनबॉक्सच्या ॲक्टिव्हिटीत याकडे नेमकेपणाने लक्ष पुरवले आहे. विचार करणारा मेंदू आणि त्याला प्रतिसाद देणारं शिक्षण यांना जोडणारी ही कडी आहे. आकलन (अर्थात एखादी गोष्ट समजणे), भाषा (अर्थात समजलेली गोष्ट व्यक्त करणे) आणि तर्क (अर्थात समजलेल्या गोष्टीविषयीची निश्चितता येणे) ही कौशल्ये येथून विकसित होणार आहे.

 

जिज्ञासा / Curiosity

झाडावरून सफरचंदे तर वर्षानुवर्षे पडतच होती. पण न्यूटनला त्याबद्दल कुतुहल वाटले आणि आपल्याला गुरुत्वाकर्षण कळले. शोधक असणे, बारकावे समजून घेणे आणि पुढे योग्य त्या परिणामांपर्यंत पोहोचणे हा प्रवास म्हणजेच कुतुहल! माणसाचा संपूर्ण विकास कुतुहलाच्या पायावरच उभा आहे. कुतुहल आपल्याला  शिक्षणाकडे, ज्ञानाकडे, कौशल्याकडे वळवते. विशिष्ट प्रतिसादांकडे आपोआपच वळणारा तो भावनिक प्रतिसाद आहे. अनबॉक्सच्या ॲक्टिव्हिटी या कुतुहलाला जागं करणाऱ्या आहेत. अनभिज्ञाविषयी आपलेपणा निर्माण झाला तर ताज्या, उत्स्फुर्त विचारांना आपोआप अवकाश मिळतो.

 

निरीक्षण / Observation

आपण सारे बघतो, शेरलॉक होम्स निरीक्षण करतो. साऱ्या हेरकथा या सूक्ष्म फरकाला विदित करतात. शिकण्याच्या टप्प्यात हा फरक अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडतो. आपण बघतो तेव्हा आपण फक्त माहिती गोळा करतो. निरीक्षण दृश्याला विचारांची किनार जोडते, जाणिवांना तीक्ष्ण करते. आपण ज्ञानेंद्रियांच्या मदतीने मिळवलेल्या माहितीचा आधार घेऊन त्याला अर्थपूर्ण बनवण्याची प्रक्रिया म्हणजेच निरीक्षण! अनबॉक्स निरीक्षणाची सवय पाडण्याचे प्रयत्न करतो.

 

योजकता / Ideation

सहज बसल्या बसल्या अनेक कल्पना जन्म घेतात. पण थेट एखाद्या समस्येलाच हात घालणारी आणि तिचे निराकरण करणारी विलक्षण कल्पला डोक्यात येणे वेगळे! हाच कल्पनाविलास होय. हे म्हणजे आपल्याकडे असलेल्या माहितीवरून निरनिराळे प्रश्न उपस्थित करायचे, त्यावर निरनिराळे तोडगे काढायचे आणि मग कल्पनेच्या ह्या प्रांतात मनसोक्त लोळून झाले की त्या माहितीचे रुपांतर एखाद्या उपयुक्त संकल्पनेत करायचे. हे असे गुंतागुंतीतून काही उकल करण्याचे, जोडतोड करण्याचे कौशल्य ज्यांच्यामध्ये आहे त्यांना अशी अकल्पित उत्तरे नियमित संकल्पनांवर नियमित दिशेनी विचार करणाऱ्या लोकांपेक्षा लवकर आणि सहजपणे सुचतात. सृजनाचा आणि परिवर्तनाचा पाया कल्पनाविलासात आहे. कल्पनाविलास आपल्याला प्रश्नांशी मैत्री करायला शिकवतो, ज्यामुळे त्यांच्याविषयीचे भय नाहिसे होते, स्वतंत्र विचार करण्याची सवय पडते.

 

संयम / Patience

तन्मयता हे सॉफ्ट स्किल या कॅटेगरीत येतं. परंतु त्याला स्वत:चे असे काही मूल्य नाही. पण काही इतर गुणांच्या सोबतीने त्याचे मूल्य वर्धित होते. आपली कल्पनाशक्ती, निरीक्षण किंवा स्वतंत्र विचार जेव्हा अपेक्षित परिणामांपर्यंत पोहोचण्याच्या वाटेत अडतात, तेव्हा अतिशय एकाग्रतेने, तन्मयतेने, सातत्याने आपल्याला आपले प्रयत्न सुरू ठेवावे लागतात. काही प्रतिकूल परिस्थितीत उतावळा किंवा अधीर असणारा हतबल होऊ शकतो. नवीन काही घडवण्याच्या त्याच्या प्रयत्नांना त्यामुळे खीळ बसू शकते. तो स्व-विनाशाकडे जाऊ शकतो. याउलट संयमी असणारा अधीर न होता सातत्याने आपले प्रयत्न चालू ठेवतो. आपल्याजवळील संसाधनांच्या मदतीने हवे ते परिणाम साधू शकतो. मुलांमधील संयम कसा वाढवता येईल यावर म्हणूनच अनबॉक्सने भर दिला आहे.

 

दृष्टिकोन / Perception

आपली ज्ञानेंद्रिये आपल्याला थेट अनुभव देतात, मूर्ताचे ज्ञान देतात. पण विचार अमूर्त असतात. त्यांना आकार नसतो, स्वत:चे असे रूप नसते. या अमूर्त विचारांना दिशा देण्याची आपल्या मेंदूची क्षमता वास्तवाला उपयुक्त ते रूप देण्यात आपली मदत करते. सफरचंद वास्तव आहे. ते डोळ्यांना दिसते. गुरुत्वाकर्षणाचे बल अनुभवता येते, पण हे आकर्षण स्वत:त अमूर्त आहे. ते विशद करणे अशक्यच! पण जटिल, किचकट कामे करताना अमूर्ताला समजून घ्यावेच लागते. यासाठी आपला दृष्टिकोन तसा विकसित करणे गरजेचे ठरते. हे संवेदनांच्या विकासाहून वेगळे आहे. ज्ञानेंद्रिये प्रत्यक्ष ते बघतात; दृष्टिकोन त्या बघितलेल्याला अर्थ देतो. आपले संवादाचे आणि समजुतींचे कौशल्य यातूनच विकसित होते. अनबॉक्सच्या ॲक्टिव्हिटीतून जटिल कल्पनांना लालित्य आणि सौंदर्य देण्याची अभिव्यक्ती कशी साधावी हा दृष्टिकोन विकसित करण्याचा प्रयत्न आहे.

 

भावना आणि बुद्धी यांचा मेळ / Emotional Intelligence 

बुद्धी विभक्त करते, भावना आणि बुद्धी यांचा मेळ आपल्याला जोडून घेतो. यामुळे समूहात राहून, आपल्याहून वेगळ्या असणाऱ्या लोकांशी स्वत:ला जोडून घेऊन कोणतेही काम करणे शक्य होते. यातून स्वत:विषयी आपण अधिक सजग होतो. आपल्या तर्कशुद्ध विचारांपल्याड असणाऱ्या भावनिक प्रतिसादांना ओळखण्यास मदत होते. भावनांक (बुद्ध्यांक नव्हे) अधिक असणाऱ्यांमध्ये समोरच्याचे आकलन करण्याची, त्याला समजून घेण्याची आणि त्याच्याविषयी सहकंप बाळगण्याची क्षमताही अधिक असते. ते प्रभावी नेतृत्व करू शकतात. स्वत:च्या क्षमतांबद्दल अनभिज्ञ असणाऱ्या लोकांच्या क्षमता समजून घेण्याची ताकद त्यांच्यात असते. अनबॉक्सच्या ॲक्टिव्हिटी भावना आणि बुद्धिचा मेळ घालून तुमच्यात सहकंपाची भावना निर्माण व्हावी यासाठी प्रयत्नरत आहेत.

 

अभिव्यक्ती / Expression

आपण खूप वेगवेगळ्या तऱ्हेने स्वत:ला व्यक्त करीत असतो. आपण गातो, रचतो, नाचतो, खेळतो.... यांपैकीच भाषा हे व्यक्त होण्याचं मात्र एक साधन आहे, आणि तेही बरेच अलिकडे विकसित झालेले! भाषेच्या उत्पत्तीच्या कितीतरी वर्षे आधीपासून आपण स्वत:ला व्यक्त करीत आहोत. माणूस हा मुळात दृश्य माध्यमांतून व्यक्त करणारा जीव आहे. भावनांची आणि विचारांची अभिव्यक्ती मानवी समूहांच्या मूळात आहे. अभिव्यक्तीतून आपण परस्परसंबंध जोडतो, भाषा, प्रांत आणि संस्कृती यांच्या सीमा ओलांडून निर्मितीच्या कार्यात एकमेकांना सहकार्य देतो. व्यक्त होणे ही आपल्या जगण्यामागची आणि कौशल्यांमागची मध्यवर्ती थीम आहे. विविध व्यासपीठांवर व्यक्त होण्याच्या, संवाद साधण्याच्या संधी अनबॉक्स तुम्हाला देते. 

 

सहकार्य / Collaboration 

कोविद-१९ सारख्या सर्वदूर पसरलेल्या रोगाने आपल्याला एकमेकांच्या सहकार्याने पुढे जाण्याची संधी निर्माण केली आहे. सोबत कामे केल्याशिवाय असाध्य ते साध्य होणार नाही याची नव्याने जाणीव करून दिली आहे. अनेक लोकांना एका समान उद्देशासाठी आपली ऊर्जा, आपला वेळ, आपली कौशल्ये पणाला लावणे म्हणजेच सहकारी तत्त्वावर काम होणे. यासाठी सक्षम, खंबीर आणि दिशादर्शक नेतृत्व हवे. कारण अशा नेतृत्वाअभावी एकमेकांशी होत असलेल्या संवादाची मांडणी आणि त्यातील सामंजस्य नेमकेपणाने साधत नाही. सक्षम नेत्यामध्ये लोकांना एकत्रित बांधून ठेवण्याचे, त्यांना प्रोत्साहित करत राहण्याचे, त्यांच्या कार्यपद्धतीला आणि मानसिकतेला हाताळण्याचे कसब असते. अनबॉक्सच्या ॲक्टिव्हिटीज् मधून प्रत्येकाचा लाभ होण्यासाठी संसाधनांचे शेअरिंग आणि समान उद्देश पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

 

व्यक्तिमत्व / Personality

कुटुंबात, समूहात, समाजात काहीतरी मूल्यवान असे योगदान असण्यामागे समूहासोबत काम करतानाही स्वतंत्र विचारसरणीची आणि स्वतंत्र कृतीची जोड आवश्यक असते. स्वतंत्र विचार करणारा स्वत:साठी वेगळ्या अवकाशाची मागणी करीत नाही, तर तो इतरांना तो अवकाश देतो. ही व्यक्ती धीट, आत्मविश्वासी असते. हिला थोड्याशा टीकेमुळे किंवा छोट्या छोट्या अपयशांमुळे असुरक्षिततेची भावना ग्रासत नाही. याउलट ही व्यक्ती अपयशांचे संधीत रुपांतर करते. त्यातून सकारात्मक धडे घेते. स्वत:च्या व्यक्तिमत्वावरील विश्वासच नेतृत्वाला जन्म देत असतो. अनबॉक्स मुलांमधील स्व‍त्वाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करते.

 

सहकंप / Empathy

आत्मविश्वास आणि फुशारकी यात एक बारीक फरक आहे. मुलात आत्मविश्वास असावा, पण त्यासोबतच सहकंपाची भावनाही असावी. इतरांना समजून घेता यावे, त्यांचे कौतुक करता यावे, त्यांच्या कामाला दाद देता यावी. हे जमले तर त्याला माणुसकीचा स्पर्श लाभतो. सहकंपाच्या भावनेनेच इतरांप्रतिचे औदासिन्य आणि अहंकार यांच्याशी दोन हात करता येतात. गटात किंवा समूहात कराव्या लागणाऱ्या अनबॉक्सच्या ॲक्टिव्हिटीज् मुलांमध्ये मतांतरांचे स्वागत करण्याची, आपल्याहून वेगळा दृष्टिकोन बाळगणाऱ्यांकडेही आपुलकीने बघण्याची दृष्टी देतात. कोणतीही अद्वितीय/अपूर्व निर्मिती हे सहयोगातूनच जन्म घेते. ती व्यक्तिनिष्ठ असते. अशी काही निर्मिती हा एकटेपणापासून दूर येऊन मैत्रभावाकडे जाणारा प्रवास असतो. सहकंप सहयोगाच्या माध्यमातून स्वत:ला इतरांच्या अनुभवांशी, मतांशी, तर्काशी, इतरांच्या आनंदाशी किंवा दु:खाशी जोडून घेतो.

 

लॅटरल थिंकिंग / Lateral Thinking

काही प्रश्नांची सरळसोट उत्तरं असतात, तर काही समस्यांची उकल करण्यासाठी अकल्पित असे मार्ग निवडावे लागतात. समस्या समजून घेण्याची पद्धतच बदलावी लागते. हेच लॅटरल थिंकिंग होय. हे आत्मसात करता येते, सरावात आणता येते आणि अंमलातही आणता येते. एकच गणित सोडवण्याच्या अनंत तऱ्हा असतात, अगदी तसेच हे! अनबॉक्सच्या ॲक्टिव्हिटींमध्ये प्रश्न सोडवण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींना वाव आहे. मुलांनी असाधारण आणि अकल्पित मार्ग निवडावे, प्रश्नांकडे थेट न बघता थोडे आडवळणाने बघावे यासाठी त्यांना उद्युक्त करणाऱ्या बऱ्याच ॲक्टिव्हिटीज् अनबॉक्सजवळ आहेत. तेच तेच तर्क लावून परिचित वाट घेण्यापेक्षा नवनव्या कल्पनांची वाट चोखाळण्याची ही संधीच त्यांच्यापुढे ठेवली आहे.

 

तर्क / Logical Thinking 

अतिरंजित बरेचदा आकर्षक असते. ते सोयीस्कर आणि सुखदायी असल्याने आपण सहज त्याच्या मोहात पडतो. तर्कशुद्ध विचार आपल्याला या जाळ्यातून बाहेर काढतात. कुठल्याही घटनाक्रमाकडे बघताना किंवा कुणी काही सांगितलेले मान्य करताना त्याला बळ देणारे पुरावे शोधण्याची सवय पाडतात. यामुळे स्वत:च्या चुकांकडेही तटस्थपणे बघता येतं आणि इतरांना त्या चुका करण्यापासून दूर ठेवायची ताकद येते. अनबॉक्सच्या ॲक्टिव्हिटीतून प्रत्येकवेळी कसे आणि का हे प्रश्न उपस्थित करण्यामागचे फायदे स्पष्ट होतात. इतरांशी वाद घालण्याआधी स्वत:शीच वाद घालण्याचे महत्त्व उमजते आणि कुठलीही समस्या सोडवण्यात हे निर्णायक ठरते.

 

क्रिटिकल थिंकिंग / Critical Thinking 

सृजनात्मक विचार हे क्रिटिकल विचारांहून भिन्न दिसतात. एक कलेबाबत आणि व्यक्तिनिष्ठतेबाबत आहेत तर दुसरे टीका, समीक्षा आणि वस्तूनिष्ठता यांबाबत आहेत. असे असूनही सृजनशीलतेत क्रिटिकल थिंकिंगचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सर्जनशील व्यक्तीला इतरांकडून प्रतिक्रिया यायला हव्या असतात. तो टीकेचे/समीक्षेचे स्वागत करतो कारण त्यात त्याला काही अस्पर्शित कंगोऱ्यांचे आकलन होण्याच्या शक्यता दिसतात. तसेच त्याच्या निर्मितीची व्याप्ती आणि खोली वाढण्याचे संकेतही त्या टीकेत त्याला आढळतात. अनबॉक्सच्या ॲक्टिव्हिटीत टीकात्मक कौतुकाला वाव आहे आणि क्रिटिकल थिंकिंगमागच्या पॉझिटिव्ह फोर्सची जागादेखील आहे.

 

प्रॉब्लेम सॉल्विंग / Problem Solving 

कला आणि कारागिरी – एकाच नाण्याच्या दोन बाजू. लॅटरल थिंकिंग सरावाची गोष्ट आहे तर प्रॉब्लेम सॉल्विंग हे कौशल्य आहे. काही जणांकडे हे कौशल्य इतरांपेक्षा अधिक असलेले दिसते. असे लोक कोडी सोडवण्यात रमतात आणि साधारणपणे नाउमेद करणाऱ्या आव्हानांचा सहज स्वीकार करतात. हे कौशल्यदेखील सरावाने आत्मसात करता येते. नव्या माहितीचे संकलन करून समोर ठाकलेली समस्या सोडवण्यासाठी तिचा वापर करणे आणि समस्या हाताळण्याच्या आपल्या पद्धतीत आवश्यक तो बदल करणे हेच प्रॉब्लेम सॉल्विंगचे गमक आहे. अनबॉक्स मुलांपुढे समस्या उभ्या करून त्यांना हाताळण्याचे त्यांचे कसब समोर आणण्याची संधी देते.

bottom of page